जळगाव । जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली. मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून एका ४२ वर्षीय अज्ञात तरुणाने उडी घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे गोलाणी मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने अचानक खाली उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. घटना लक्षात येताच मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post