जळगाव : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या बाजारात दर घसरण्याचा सिलसिला कायम असून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट झाली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात २० हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीत आज सकाळच्या सत्रात सोन्यात २८०० रुपयांची तर चांदीत ४ हजाराची घसरण झालाय. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ३२ हजार रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा भाव १ लाख ६९ हजार रुपयावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात पुन्हा खरेदीची आशा निर्माण झाली आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीतील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, बाजारातील बदल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींनुसार या मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार होत आहेत.
दर आणखी कमी होण्याची शक्यता?
जागतिक परिस्थिती स्थिर राहिल्यास सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या खरेदी करावी की आणखी काही दिवस दर कमी होण्याची वाट पाहावी, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर झालेल्या दरकपातीमुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढण्याची शक्यता असून आगामी काळात बाजारातील दर कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post