जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडींचा धडाका लावला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर तब्बल ११ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. पक्षनिहाय विचार करता शिवसेना शिंदे गटाचे सहा, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. महायुतीच्या नेत्यांनी परस्पर समन्वय आणि चर्चेच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची माघार घडवून आणली. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, ११ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांसह दिग्गजांची बाजी
शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुमित किशोर पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील आणि सोमसिंग खुमानसिंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून मंत्री गिरीश महाजन, रोहित निकम आणि रजनी सावकारे यांनी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोनल संजय पवार आणि जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नेत्यांच्या कुटुंबीयांनाही संधी
या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही बिनविरोध निवडून येत जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील आणि मातोश्री नलिनी पाटील, जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार तसेच आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे आणि खासदार उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांच्या सहभागाची चर्चा रंगली आहे.
पाहा, बिनविरोध निवडून आलेल्या ११ उमेदवारांची यादी
शिवसेना शिंदे गट – ६ जागा
मंत्री गुलाबराव पाटील
आमदार चंद्रकांत सोनवणे
सुमित किशोर पाटील
मृणाल अमोल पाटील
नलिनी चिमणराव पाटील
सोमसिंग खुमानसिंग पाटील
भाजप – ३ जागा
मंत्री गिरीश महाजन
रोहित निकम
रजनी सावकारे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – २ जागा
सोनल संजय पवार
जयश्री अनिल पाटील
अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११ जागांवरील बिनविरोध निवडी स्पष्ट झाल्या आहेत. आता उर्वरित जागांवरील लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत पुढील राजकीय घडामोडी काय होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.














Discussion about this post