नागपूर : राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन अवघ्या दोन आठवड्यांचे ठेवण्यात आल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची जोरदार मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आपली भूमिका मांडताना, “इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट असा मॅसेज बाहेर जायला नको,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.
येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून १८ डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा कालावधी पुरेसा नसल्याचे मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरण्याची भूमिका
अधिवेशनाच्या कमी कालावधीमुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकणार नाही, अशी चिंता मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित प्रस्ताव यांसारख्या विषयांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने बोनस जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनात सविस्तर चर्चा झाली पाहिजे. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अधिवेशन घेऊन चालणार नाही, असा त्यांचा सूर होता.
दोन आठवड्यांसाठी मंजुरी, गरज पडल्यास मुदतवाढ
बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी अधिवेशनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असून सध्या दोन आठवड्यांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, कामकाजाचा व्याप लक्षात घेता अधिक दिवसांची आवश्यकता भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करताना, दोन आठवड्यांचा कालावधी अपुरा ठरल्यास अधिवेशनाचे दिवस वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेत्याने अधिवेशनाच्या कालावधीवरून सरकारसमोर नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेऊन हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post