पंढरपूर : तालुक्यातील आंबे येथे विहिरीचा कठडा कोसळून चार मजूर गाडले गेल्याच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर सुमारे २० तासांपासून बचावकार्य सुरू असून, रात्री दोन वाजेपर्यंत तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला असून, चौथ्या मजुराचा शोध अद्याप सुरू आहे.
आंबे येथील एका विहिरीचे काम सुरू असताना काल सकाळी सुमारे दहा वाजता अचानक विहिरीचा कठडा कोसळला. त्यावेळी काम करणारे चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. दिवसभर बचावकार्य सुरू होते. त्यानंतर सायंकाळी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधकार्याला वेग आला.
रात्री दोन वाजेपर्यंत बचाव पथकाला तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र, अजून एक मजूर विहिरीत अडकलेला असून त्याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे देखील कालपासून घटनास्थळी ठाण मांडून असून, बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
या दुर्घटनेबाबत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, विहिरीच्या कामासाठी नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, ब्लास्टिंग करण्यात आले होते का आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याची सखोल चौकशी केली जाईल.
या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, चौथ्या मजुराचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी विहीर खोदाईचे काम सुरू करण्यापूर्वी शासनाच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.















Discussion about this post