जळगाव । महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील भंगाळे यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या मिश्किल टोलेबाजीने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.
भाषणाच्या सुरुवातीलाच गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा ‘ज्येष्ठ बंधू’ असा उल्लेख केला. “गिरीश महाजन यांचे वय ६७, तर माझे वय ६० आहे. राजकारणात सर्वाधिक समाधान कोणत्या कामाचे मिळते, तर ते रुग्णसेवेचे आहे. त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आम्ही आहोत,” असे म्हणत त्यांनी सुरुवातीलाच मिश्किल अंदाजात टोलेबाजी केली.यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगताना, “आमच्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात. घर नांदत नाही अशा महिलाही येतात. त्यामुळे आम्ही जनरल फिजिशियनसारखे काम करतो,” अशी टिप्पणी केली.
गिरीश महाजन कार्यक्रमाला तब्बल एक तास उशिरा पोहोचल्याचा संदर्भ देत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मिश्किल टोला लगावला.“२८८ पैकी २६५ आमदारांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. मलाही बीपी-शुगरचा त्रास आहे. तरीही १२ वाजल्यापासून मी गिरीश महाजन यांच्यासाठी उपाशी आहे, त्यांची वाट पाहत बसलो,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
जिल्हा बँक निवडणुकीवरूनही फटकेबाजी
दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील माघारी आणि राजकीय समीकरणांवरूनही गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याकडे मिश्किलपणे पाहत भाष्य केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना सूचकपणे सूचना केली.यावेळी “गिरीश महाजन संकटमोचक आहेत, लय लफडेबाज माणूस आहे,” अशी मिश्किल टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही जुगलबंदी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.














Discussion about this post