जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर होताना दिसत आहे. जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून महाजन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे रघुनाथ सखाराम पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला होता. या निर्णयाला त्यांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे आव्हान दिले होते. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळालेला नाही. सहनिबंधकांनी त्यांचे अपील फेटाळल्याने महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वाढली आहे. मात्र, आता रघुनाथ पाटील न्यायालयात दाद मागणार का, याकडे लक्ष लागले आहे.
महाजनांच्या विरोधकांना दुसऱ्यांदा धक्का
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात रघुनाथ सखाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटींचे कारण देत त्यांचा अर्ज बाद ठरवला. या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले. मात्र, सहनिबंधकांनीही त्यांचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे महाजन यांच्यासमोरील निवडणुकीचे आव्हान सध्या कमी झाले आहे. तरी न्यायालयीन पर्याय खुला असल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
२१ जागांसाठी निवडणूक; तीन जागा आधीच बिनविरोध
दुसरीकडे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी येत्या २९ तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख आमदारांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये बहुतांश जागांबाबत एकमत झाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. जवळपास ९० टक्के जागांवर सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी मुक्ताईनगर, पाचोरा-भडगाव आणि चोपडा येथील उमेदवारीचा पेच अद्याप कायम आहे.














Discussion about this post