मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र, यावेळीही चर्चेत असलेल्या ‘मफलर मॅन’च्या नावाबाबत त्यांनी कोणताही स्पष्ट खुलासा केला नाही.
अजित पवार यांच्या अपघातामागील सत्य अद्याप समोर आलेले नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. “दादांच्या अपघातामागे सत्य काय आहे, हे अजूनपर्यंत आपल्याला समजले नाही. ते समजावे, असे आपणा सर्वांना वाटते,” असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना रोहित पवार यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचाही उल्लेख केला. लोकांच्या आणि राज्याच्या हितासाठी अजित पवार निर्णय घेत असत. मिश्किलपणे बोलणारा आणि टीका करणारा नेता आज आपल्यात नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
“अपघात की घातपात?”; रोहित पवारांचा सवाल
अजित पवार यांच्या निधनाबाबत अपघात की घातपात, हा सवाल सर्वांच्याच मनात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. “आमच्याकडे प्रामाणिक लोक आहेत. या लोकांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. ती माहिती मी आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
माहिती देणाऱ्या व्यक्तींनाही धोका असल्याचा दावा करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यापर्यंत कोण पोहोचू शकते याची त्यांना जाणीव आहे. मात्र, संबंधित व्यक्तींनी कारवाईची भीती न बाळगता माहिती दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीबीआय तपासावरही सवाल
अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत साडेनऊ महिन्यांत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याने शंका निर्माण होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.घातपात झाला आहे का, याची चौकशी करण्यासाठी तपास सीआयडीकडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीबीआय चौकशीबाबतही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला.“सीबीआयकडे तपास देण्यात येणार, असे आम्ही बोललो नव्हतो. अजित पवार यांचेच आमदार सीबीआय चौकशीची मागणी करत होते. सत्ताधाऱ्यांनी विनंती करूनही तपास सीबीआयकडे गेला नाही,” असा दावा रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताबाबतचे संपूर्ण सत्य समोर यावे आणि या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी मागणी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा केली आहे.















Discussion about this post