जळगाव । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून, जळगाव शहरातही या घडामोडींचे पडसाद उमटले. पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या खासदारांविरोधात शिवसेना (उबाठा)च्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.
जळगाव शहरात शिवसेना (उबाठा) महानगर प्रमुख शरद आबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी पक्षनिष्ठेच्या घोषणा देत बंडखोरी करणाऱ्या खासदारांवर जोरदार टीका केली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव करण्यात आला. “शिवसेना निष्ठावंतांच्या बळावरच उभी आहे आणि पुढेही राहील,” असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचेही स्पष्ट केले.
या आंदोलनात महिला महानगर प्रमुख मनिषा पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, किरण भावसार, गणेश गायकवाड, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, विनायक धर्माधिकारी, प्रेमराज राठोड, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव, अरुण सोनवणे, राजू पाटील, किरण ठाकूर, स्वप्निल राजपूत, संदीप माळी, किशोर धनगर आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा पुन्हा अधोरेखित करत बंडखोर खासदारांविरोधातील तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.















Discussion about this post