जळगाव । दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना आता दुधाच्या दरातही पुन्हा वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने विकास दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. २७ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दीड महिन्याच्या अंतराने झालेली ही दुसरी दरवाढ असून, वर्षभरातील चौथी वाढ आहे.
जळगाव शहरातील दूध बाजारपेठेत विकास दुधाचा मोठा प्रभाव आहे. शहरात विकल्या जाणाऱ्या एकूण दुधापैकी सुमारे ५० टक्के वाटा विकास दुधाचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
दूध संघाने यापूर्वी २७ फेब्रुवारी, १२ ऑगस्ट आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रति लिटर २ रुपयांनी दर वाढवले होते. आता २७ नोव्हेंबरपासून पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर गोल्ड दूध ८२ रुपये, प्रमाणित दूध ७४ रुपये, तर गायीचे दूध ६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
म्हणजेच, गेल्या वर्षभरात चार वेळा दरवाढ झाल्याने ग्राहकांना आता प्रति लिटर ८ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दीड महिन्यांच्या कालावधीतच दुधाचे दर चार रुपयांनी वाढले आहेत.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम दूध व्यवसायावरही झाला आहे. चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढला आहे. त्यातच दूध उत्पादनात घट झाली असून, दूध संघाकडे होणारी दुधाची आवक सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे. परिणामी, मागणी आणि उपलब्धता यातील तफावत वाढल्याने दूध खरेदीचे दरही वाढले आहेत.
दुधाच्या दरवाढीमुळे आता घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. विशेषतः रोज दूध वापरणाऱ्या कुटुंबांना महिन्याच्या खर्चात वाढ सहन करावी लागणार आहे. याशिवाय हॉटेल, चहाच्या टपऱ्या, मिठाई विक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही वाढीव दरांचा फटका बसू शकतो. त्यामुळे येत्या काळात चहा, दही, ताक आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post