राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात; लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, आर्थिक सहाय्य, व्यवसाय साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा त्यांनी लावलेला वटवृक्ष आजही समाजाला आधार देत असून त्यांचे कार्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. सामाजिक न्याय दिन हा मानवतेचा जागर करण्याचा दिवस आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी, समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याची संधी पोहोचली, तरच सामाजिक न्यायाची संकल्पना पूर्णत्वास जाईल,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे समाजकल्याण विभागातर्फे आयोजित ‘सामाजिक न्याय दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल राठोड, विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, विद्यार्थी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा घेत समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की ,”समाजकल्याण विभागाने प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना संवेदनशीलतेने पोहोचविण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, अत्याचारग्रस्त कुटुंबांना न्याय, ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक सहाय्य, पारंपरिक व्यवसायांना बळ देण्यासाठी स्टॉलचे वितरण अशा उपक्रमांमधून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.”
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समतावादी व लोककल्याणकारी विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजहित आणि प्रगतीचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी. तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, “राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षणप्रेमी व समाजहितवादी विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून समता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रगतीचा मार्ग स्वीकारावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी प्राचार्य प्रा. बडगुजर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणांचा, स्त्री शिक्षण, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दिवंगत व्यक्तींच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त 43 पैकी प्रतिनिधिक स्वरूपात 4 विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. चर्मकार समाजातील गटई 10 कामगारांना व्यवसायासाठी स्टॉलचे वाटप करून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यात आली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर कार्यालय अधीक्षक श्री. राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकल्याण विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुका समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.














Discussion about this post