मुंबई । महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशातील विविध पदाधिकाऱ्यांकडे असलेल्या जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी पदांच्या जबाबदाऱ्या तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. या निर्णयामुळे युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय संघटनात्मक रचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील उपाध्यक्षांचे झोनल इन्चार्ज प्रभारी, संघटन महासचिव प्रभारी, लीगल टीम, मीडिया टीम आणि सोशल मीडिया टीम, कोषाध्यक्ष तसेच प्रशासकीय महासचिव प्रभारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडे असलेल्या जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारीच्या जबाबदाऱ्या स्थगित करण्यात आल्या आहेत.या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली असून, संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये जिल्हास्तरीय जबाबदाऱ्यांची नव्याने आखणी होण्याची शक्यता आहे. जिल्हा स्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या नियुक्त्या केल्या जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, या जबाबदाऱ्या स्थगित करण्यामागील नेमके कारण काय आहे, याबाबत आदेशात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निर्णय नियमित संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग आहे की आगामी काळातील मोठ्या बदलांची पूर्वतयारी, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा हा संघटनात्मक आदेश प्रभारी अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे, सहप्रभारी नवज्योतसिंग संधू आणि सहप्रभारी शांभवी शुक्ला यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, या आदेशाचा अर्थ संबंधित पदाधिकाऱ्यांची मूळ पदे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे, असा होत नाही. केवळ जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून असलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुढील आदेशात युवक काँग्रेसकडून कोणते निर्णय घेतले जातात आणि जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांची नव्याने विभागणी कशी होते, याकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post