राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून, यासाठी शासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाकडून १७०० हून अधिक तलाठी पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हानिहाय रिक्त पदांचा अहवाल तयार केला जात असून, त्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या भरतीमध्ये राज्यातील सुमारे ३३ विभागांतील ११० आस्थापनांमध्ये एकूण ३६०० हून अधिक संवर्गांचा समावेश आहे. सरळसेवा भरतीसाठी १४०० पेक्षा जास्त सेवाप्रवेश नियम लागू आहेत.
पूर्वी विविध विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र, या परीक्षा खासगी संस्थांकडून घेतल्या जात असल्याने गैरप्रकारांच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे पारदर्शकता वाढवण्यासाठी सरळसेवा भरती एमपीएससीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
या निर्णयामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन प्रक्रिया अधिक सुसूत्र होणार आहे. तसेच, अधिकाधिक उमेदवारांना समान संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या मेगाभरती घोषणेमध्येही या तलाठी भरतीचा समावेश असून, लवकरच याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.














Discussion about this post