भुसावळ | भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात वरिष्ठ लिपिकाने वेतन प्रणालीत फेरफार करून तब्बल ८६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तनुज रवींद्र सैंदाणे (वय ३५, रा. पवन हिल्स, जळगाव) असे वरिष्ठ लिपिकाचे नाव असून याप्रकारणी उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी भुसावळ शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वरिष्ठ लिपिकाकडे कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार करणे, पूरक देयके सादर करणे तसेच कोषागाराशी संबंधित आर्थिक कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा गैरफायदा घेत त्याने फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये स्वतःच्या वेतन आणि विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ केल्याचा आरोप आहे.
या फेरफारच्या आधारे तयार करण्यात आलेली वेतन बिले खरी असल्याचा आभास निर्माण करून ती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर ही बिले कोषागार कार्यालयात पाठवून सुमारे ७० लाख ३८ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि इतर कपातीच्या रकमांमध्येही फेरफार करण्यात आला. या माध्यमातून १५ लाख ७० हजार रुपयांहून अधिक रक्कम स्वतःच्या निवृत्ती वेतन खात्यात जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विभागाच्या उपअभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
सरकारी वेतन प्रणालीतील या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणातील सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post