जळगाव । जळगाव बसस्थानक परिसरात भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने आणि पैसे लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचोरा आणि चाळीसगाव परिसरातून दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
भोंदूगिरीच्या साहाय्याने ज्येष्ठ नागरिकांची लूट
काही दिवसांपूर्वी जळगाव बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला दोन भामट्यांनी “तुमच्यावर मोठा शनिदोष आहे, तो आम्ही काढून देतो,” असे सांगून भोंदूगिरीच्या साहाय्याने संमोहन करून लुटले होते. त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा आणि चाळीसगाव येथून अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) व मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीतील त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.















Discussion about this post