जळगाव । जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीचा गुन्हा जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ५ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला लॅपटॉप, मोबाईल आणि रोकडसह ६३ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरातील गॅरेज व्यावसायिक सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या बंद घराला लक्ष्य केले होते. चोरट्यांनी घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, एक पितळी कळशी आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापेमारी करून राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले.
सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोन्ही संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन्ही मोबाईल, पितळी कळशी आणि रोकड असा ६३ हजारांचा मुद्देमाल जसाच्या तसा जप्त केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.















Discussion about this post