धाराशिवमध्ये १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील अनियमिततेप्रकरणी चौकशी अंती १७ अधिकारी दोषी ठरले. या दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांपैकी १५ कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कृषी खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत राबवण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर कृषी मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. चौकशीत भूमिहीन, मयत, दुबार आणि बिगर सभासद शेतकऱ्यांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वाटप झाल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. या प्रकरणात तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
चौकशीअंती १५ कृषी अधिकारी दोषी आढळून आले. त्यानंतर दोन जिल्हा कृषी अधीक्षक, ८ तालुका कृषी अधिकारी आणि ४ मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह एकूण १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याबाबत आमदार कैलास पाटील यांनी तक्रार केली होती. तर शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी आंदोलनही छेडले होते. मात्र, केवळ निलंबनावरच कारवाई थांबणार की संबंधित अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे ही दाखल केले जाणार याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post