जळगाव । जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये अवघ्या ८०० रुपयांच्या किरकोळ वादातून एका आत्तेभावाने आपल्याच मामेभावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर नराधम आरोपीने मृत व्यक्तीचे सर्व दात तोडून त्याच्याच बॅगेत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या भीषण हत्याकांडामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली जगत आहेत.

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत धर्मा जुगा पवार आणि संशयित आरोपी जुगा कांतिलाल पवार हे दोघे एकमेकांचे भाऊ (आत्तेभाऊ-मामेभाऊ) असून, ते गावोगावी फिरून बनावट रुद्राक्ष विकण्याचा व्यवसाय करीत होते. काल धर्मा पवार याने ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास हे दोघे जण रेल्वे स्थानकाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते.
दारू पितानाच दोघांमध्ये त्या ८०० रुपयांच्या वाटणीवरून आणि पैशांवरून वाद सुरू झाला. वाद इतка टोकाला गेला की, रागाच्या भरात आरोपी जुगा पवार याने धर्मा पवार याला दगडाने बेदम मारहाण करत त्याचा खून केला. या हल्ल्यात धर्मा पवार जागीच मृत पावला.
पोलीस कारवाई आणि आरोपी गजाआड
या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. खुनाची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान, शेताजवळ कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आल्याने पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला. त्यावेळी आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत शेतातच बसलेला पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगेत मृताचे दात तसेच दोन जीवंत कबुतरे आढळल्याने पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी तातडीने आरोपी जुगा पवार याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येचे नेमके कारण व यामागे इतर काही आहे का, याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.














Discussion about this post