भुसावळ | भुसावळ एमआयडीसी परिसरातील ‘एनआरजे फार्माकेम प्रायव्हेट लिमिटेड’ या केमिकल कंपनीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत कंपनीतील सुमारे २० ते २५ टन रासायनिक कच्चा माल जळून खाक झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार अडीच ते तीन कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी टळली असली, तरी कंपनी परिसरातील दोन मुक्या प्राण्यांचा (गायींचा) होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
कंपनीला आग लागल्यानंतर काही वेळातच तिने अत्यंत रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता वाढल्याने कंपनीतून एकापाठोपाठ एक स्फोटांचे तीव्र आवाज येऊ लागले. मध्यरात्री झालेल्या या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, आजूबाजूच्या नागरिकांमध्ये मोठी भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जितेंद्र वानखेडे यांच्या मालकीच्या या कंपनीत इनऑरगॅनिक व ऑरगॅनिक ॲग्रो केमिकल्स तसेच खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती केली जाते.

२० ते २५ अग्निशमन बंबंकडून अथक प्रयत्न
कंपनीतील आग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस कंट्रोल रूममार्फत तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. आगीची भीषणता पाहता भुसावळ नगरपरिषद, जळगाव, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक वीज केंद्र आणि वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील तब्बल २० ते २५ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. सर्व जवानांनी संयुक्तपणे अथक प्रयत्न करत पाण्याचा व फोमचा मारा केला आणि अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
घटनास्थळी आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी प्राथमिक चर्चा होती. मात्र, महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. कंपनीच्या गेटजवळील वीज वितरण कंपनीचे मीटर आगीमुळे पूर्णपणे वितळल्याचे आणि परिसरातील झाडालाही आगीची झळ बसल्याचे दिसून आले. आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे लागली की रासायनिक अभिक्रियेमुळे याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. याप्रकरणी भुसावळ पोलिसांकडून पुढील सखोल तपास सुरू आहे.















Discussion about this post