महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
5,707 पदांसाठी होणार भरती
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 द्वारे राज्यातील विविध विभागांतील एकूण 5,707 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध विभागांच्या मागण्या समाविष्ट करून पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी केवळ त्यांच्या ‘My Account’ मधून आवश्यक माहिती अद्ययावत करावी. कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येणार असून, पात्रता सिद्ध न झाल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
बेलिफ-लिपिक परीक्षा 6 सप्टेंबरला
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा-2026 रविवार, 6 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे.
ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या केंद्रांवर होणार आहे. पहिला पेपर सकाळी 11 ते दुपारी 12, तर दुसरा पेपर दुपारी 3 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात येईल.
प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी
जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्थायी किंवा कायमस्वरूपी निवासाच्या तपशीलानुसार परीक्षा केंद्र निश्चित केले जाईल. तसेच, परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, 15 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील आणि 30 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत राहतील. उमेदवारांनी अधिकृत सूचनांनुसार वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.















Discussion about this post