मुंबई । काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडून त्यांनी निषेध व्यक्त केला. मात्र, या आंदोलनादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो चुकून फाडला गेल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील काही उल्लेख आणि त्यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जुन्या छायाचित्रांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पुस्तकातील मजकुरामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पुस्तकाच्या प्रतीचे पान फाडून आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात सायना एनसी यांच्याकडून पुस्तकाची प्रत फाडताना चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सावरकरांच्या कथित अपमानाचा निषेध करताना बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनेही सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. तर शिंदे गटाच्या या आक्रमक भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post