जळगाव । जळगाव शहरातून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. नातेसंबंधाचा गैरफायदा घेत एका ११ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप ३२ वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलगी जळगाव शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत राहत होती. याच काळात आरोपी निलेश कमलाकर गुरव (वय ३२, रा. फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव) याने नातेसंबंधाचा आणि मुलीच्या आतेभावाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.
आरोपी वारंवार पीडितेच्या घरी येत असे. त्यावेळी मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी निलेश गुरव याला १९ डिसेंबर २०२६ रोजी पहाटे २ वाजून ४ मिनिटांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वरकड करीत असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.















Discussion about this post