जळगाव । जळगाव शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन इसमांकडून १० लाख १५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत जळगाव शहरात काही इसम सोन्याचे बिस्किट घेऊन त्याची परस्पर विक्री करण्याच्या संदर्भात संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पुढील कारवाईसाठी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहीम बेग आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगल नथ्थू साळुंखे यांना रवाना करण्यात आले.
त्यानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता मुजुमदार रोड, जळगाव येथे बुलेट मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे १) हरीप राजेंद्र महाजन (वय ३०), २) सुजित गोकुळ महाजन (वय २६), दोन्ही रा. मंदिरा, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव अशी निष्पन्न झाली.
पोलिसांनी त्यांची व त्यांच्याकडील हिरवट करड्या रंगाच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये १०० रुपये व ५०० रुपये दराच्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा आढळून आल्या. यामध्ये एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. या रोकडबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने पोलिसांनी पुढील कारवाई केली. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी या कारवाईत एकूण १० लाख १५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये १०० रुपयांच्या ५ हजार चलनी नोटा (५ लाख रुपये), ५०० रुपयांच्या ५०० चलनी नोटा (२ लाख ५० हजार रुपये), बुलेट मोटारसायकल (२ लाख ५० हजार रुपये), पांढऱ्या रंगाचा आयफोन (६५ हजार रुपये), विवो कंपनीचा तांबड्या रंगाचा मोबाइल (२८ हजार रुपये), विविध दरांच्या चलनी नोटा (२ हजार १२० रुपये) आणि हिरवट करड्या रंगाची वापरती बॅग यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव परिमंडळ अतिरिक्त कार्यभार जळगाव परिमंडळ तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहीम बेग आणि मंगल नथ्थू साळुंखे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी संबंधित पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.















Discussion about this post