जळगाव । जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका आता असह्य झाला हे. जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून पुढील ४८ तास जळगावकरांसाठी कमालीचे जिकरीचे आणि त्रासाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जळगाव शहराचा पारा थेट ४६ अंश सेल्सिअस या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरात ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, ज्याने नागरिकांना पुरते हैराण केले होते.
मंगळवार आणि बुधवार ठरणार महत्वाचा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी उष्णतेची लाट अधिक भीषण रूप धारण करणार आहे. दुपारच्या वेळेस रस्त्यांवर फिरताना अक्षरशः अंगाची लाहीलाही होत असून, नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहेत. या वाढत्या तापमानामुळे उष्माघात आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात शेतात वा बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.अत्यंत महत्त्वाचे किंवा तातडीचे काम असल्याशिवाय दुपारच्या या ४ तासांत घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळावे.
शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तहान नसली तरीही सतत भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा ताक प्यावे.उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला त्रास होणार नाही असा हलका आणि सुपाच्य आहार घ्यावा. तेलकट पदार्थ खाणे टाळावे.अपरिहार्य कारणास्तव बाहेर पडावे लागल्यास डोक्याला पांढरा रुमाल किंवा टोपी नक्की वापरावी.















Discussion about this post