मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना इंधन आणि संसाधनांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या जागतिक तणावामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करावा, सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रोला प्राधान्य द्यावे, शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारावा तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा, असे आवाहन पंतप्रधानांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा केले. या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अर्थकारणावर संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सरकारने तीन मोठे निर्णय जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र सरकारचे ३ महत्त्वाचे निर्णय
१. महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ यंदा फ्रान्समधील ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी जाणार नाही.
२. शासकीय कामकाजासाठी यापुढे केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर
३. प्रशासकीय विभागांच्या सर्व बैठका ऑनलाइन (Virtual) घेतल्या जातील.
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर मर्यादा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर देत खर्चात बचत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी यंदा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, “देश कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागीय खर्चात संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात जास्तीत जास्त बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेतल्या जातील.”दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपटांशी संबंधित आवश्यक समन्वय ऑनलाइन माध्यमातून केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post