जळगाव । शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील शामनगरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य करत चोरी केल्याची घटना समोर आली आहे. कटरच्या सहाय्याने घरांचे कुलूप आणि कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि रोकड व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारे तीन संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
शामनगर परिसरातील एकाच रांगेत असलेली तीन बंद घरे चोरट्यांनी हेरली होती. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क आणि हातात हातमोजे घातलेले तीन जण परिसरात आले. त्यांनी कटरच्या सहाय्याने घरांचे कुलूप आणि कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटांची उचकापाचक करून लॉकरमधील ऐवज चोरून नेला.
एका घरातून दहा हजारांची रोकड लंपास
तीनपैकी एका घराचे मालक रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या घरातून सुमारे दहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य दोन घरांचे मालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते परतल्यानंतर चोरीचा तपशील समोर येणार आहे.
चोरीच्या घटनेतील तिन्ही संशयितांच्या हालचाली एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. फुटेजमध्ये चोरटे बॅटरीच्या प्रकाशात घराचे कुलूप तोडताना दिसत आहेत. त्यातील एक जण दरवाजाजवळ थांबून बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचेही दिसून येते. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.चोरी झालेल्या घरांच्या शेजारीच एक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राहतात. पहाटे घराबाहेर आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बाहेरगावी असलेले घरमालक परतल्यानंतर चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post