जळगाव । जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) असं अपघातातील मृत महिलेचं नाव असून या दुर्घटनेत त्यांचा मुलगा भरत माळी (२९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर चालकाने टँकरसह पलायनाचा प्रयत्न केला; मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्राप्त माहितीनुसार, मंगला माळी या दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मायलेक रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मंगला माळी टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या नागरिकांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नागरिकांच्या तत्परतेमुळे चालकाचा पलायनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघाताची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
या अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर भरधाव धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. निष्पाप कष्टकरी महिलेचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून संबंधित टँकर चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.















Discussion about this post