जळगाव । जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेत तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांना जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिपेठ पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, २० वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही तरुणी आढळून आली.
तपासादरम्यान तिच्याकडे भारतात वास्तव्यास राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा प्रवासी कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिने बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून जळगावात वास्तव्यास असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’वरून झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. लग्न करण्याच्या उद्देशाने कोणीका हिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मय वाला यांच्याविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बांगलादेशी तरुणीला अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कोणीका आणि चिन्मय यांनी आम्ही लग्न केले असल्याचा दावा पोलिसांसमोर केला आहे. मात्र, त्यांच्या विवाहासंदर्भातील कोणताही अधिकृत पुरावा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.














Discussion about this post