जयपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ‘CJP’कडून सुरू करण्यात आलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला राजस्थानमध्ये कथित हल्ल्याचे गालबोट लागले आहे. जयपूरजवळील रामपुरा-कंवरपुरा परिसरातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या CJPच्या टीमला काही व्यक्तींनी मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. CJPचे आशुतोष रांका यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष रांका यांनी शुक्रवारी सकाळी या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मोठी गर्दी जमल्याचे तसेच दोन गटांमध्ये धक्काबुक्की आणि वाद सुरू असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी शाळेजवळचा असल्याचा दावा रांका यांनी केला आहे.
रांका यांच्या आरोपानुसार, संबंधित सरकारी शाळेची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब आहे. शाळेत विद्यार्थ्यांना योग्य वातावरण उपलब्ध नसून, चक्क म्हशींच्या तबेल्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला. शाळेची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून त्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने CJPची टीम तेथे गेली होती. मात्र, टीम पोहोचताच काही व्यक्तींनी विरोध करत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यह वहाँ के गाँव वाले नहीं भाजपा के बुलाये हुए गुंडे है। इनका सरगना कमल प्रधान वहाँ गरीब लोगों की ज़मीन पर कब्जे का काम करता है।
बच्चों को भैंसों में तबेले में पढ़ाया जा रहा है, और यह रोकने पर भाजपा अपने गुंडे भेज रही है।
क्या शर्मनाक स्थिति है। https://t.co/8A3SeYvpHR https://t.co/Z4g4aHZXCq
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) August 21, 2026
‘शाळा सुधारण्याला विरोध का?’
या घटनेनंतर आशुतोष रांका यांनी भाजपवर निशाणा साधला. मुलांनी खराब परिस्थितीत शिक्षण घ्यावे हे भाजपला मान्य आहे; मात्र शाळेची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात असताना त्याला विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर केलेल्या आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये रांका यांनी विरोध करणारे लोक स्थानिक ग्रामस्थ नसून भाजपकडून बोलावण्यात आलेले लोक असल्याचा दावा केला. कमल प्रधान नावाच्या व्यक्तीवरही त्यांनी गंभीर आरोप करत तो संबंधित लोकांचा प्रमुख असल्याचे म्हटले आहे.
राजस्थान पोलिसांवरही प्रश्नचिन्ह
CJPचे अभिजीत दीपके यांनी या घटनेवरून राजस्थान पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या CJP स्वयंसेवकांवर कथित हल्ला होत असताना पोलीस मूकदर्शक बनून राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप किंवा आरोप करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तींकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे CJPकडून करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या घटनेमुळे राजस्थानातील सरकारी शाळांच्या परिस्थितीबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे.















Discussion about this post