जळगाव । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आल्याने दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वादानंतर काही तरुण एकत्र आले आणि समोरील गल्लीत दगडफेक करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तसेच एसडीपीओंचे आरसीपी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा ताबा घेत जमाव पांगविला. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.
दरम्यान, दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दगडफेकीत सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर सुप्रीम कॉलनी परिसरातील परिस्थिती सध्या सामान्य आणि नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.















Discussion about this post