फैजपूर : फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह एका संशयिताविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, फैजपूर, यावल पोलिस ठाणे आणि निंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांना अकलूद शिवारातील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका पंटरला संबंधित ठिकाणी पाठवून माहितीची खात्री केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने दुमजली घरावर छापा टाकला.
पोलिसांनी घराची पाहणी केली असता, दुमजली इमारतीत अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. छाप्यात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला मूळच्या कोलकाता, पश्चिम बंगाल येथील असून सध्या त्या परिसरात स्थायिक आहेत. तर एक महिला भुसावळ येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलांची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील इतर बाबींचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या नियोजनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अकलूद शिवारातील सुरू असलेल्या कथित कुंटणखान्याचा पर्दाफाश झाला. या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.















Discussion about this post