नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील विरोधकांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या खासदारांना दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार राजघाटकडे रवाना झाले.

यापूर्वीही खरगे यांच्या भोजन बैठकीनंतर विरोधी खासदारांनी आंदोलनाची दिशा ठरवली होती. त्यानंतर दिल्लीतील आंदोलनाला वेग आला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
राजघाटकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राज्यसभा आणि लोकसभेतील सुमारे ३०० खासदार आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला शांततापूर्ण आंदोलन करायचे आहे, असा दावा त्यांनी केला.
गेल्या दोन दिवसांपासून विरोधी खासदारांना आंदोलन करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर अडवण्यात आले, तर त्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पोलिसांनी अडवल्याचे त्यांनी म्हटले. आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
‘कारवाई केली जाईल’ असा राहुल गांधींचा इशारा
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘मतचोरी’च्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, यासाठी संबंधितांवर भविष्यात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाने यापूर्वी नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विरोधी खासदार राजघाटकडे रवाना झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे विरोधकांचा नियोजित कार्यक्रम आणि पोलिसांची भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post