मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मुंबईतील मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित प्रसंग घडला. देश आणि राज्यातील परिस्थितीवर बोलताना ते भावूक झाले आणि काही क्षणांसाठी काय बोलायचे हे त्यांना सुचले नाही. त्यानंतर “मी भाषण विसरलो… थोड्या वेळाने परत येतो,” असे सांगत त्यांनी स्टेज सोडले. या घटनेमुळे उपस्थित मनसैनिक काही काळ आश्चर्यचकित झाले. मात्र, सुमारे दहा मिनिटांनी ते पुन्हा व्यासपीठावर परतले आणि केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत भाषण पूर्ण केले.
मुंबईत आयोजित मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. अमित ठाकरे व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मिश्किल शैलीत वातावरण हलकेफुलके केले. “थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण आटपेल,” असे म्हणताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यावर “अरे, मी मजाक केली,” असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
भाषणादरम्यान त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दलही मनोगत व्यक्त केले. “मी राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे म्हणून राजकारणात आहे. ते नसते तर मी राजकारणात आलो नसतो. मात्र, तुमच्यासारख्या सहकाऱ्यांचे पाठबळ नसते तर राजकारणात टिकणे शक्य झाले नसते,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांचे कौतुक केले. देश आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना ते काहीसे भावूक झाले. “आपण भूतकाळातील आंदोलनांवर न थांबता पुढे पाहिले पाहिजे… देशाची आणि राज्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे…” असे बोलत असतानाच ते अचानक थांबले. “मला काय बोलायचे ते आठवत नाही… मी थोड्या वेळात परत येतो,” असे सांगून त्यांनी व्यासपीठ सोडले.
सुमारे दहा मिनिटांनंतर अमित ठाकरे पुन्हा मंचावर आले. त्यानंतर त्यांनी आपले भाषण पूर्ण करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.
या घटनेची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, भाषणादरम्यान घडलेल्या या प्रसंगाचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.















Discussion about this post