बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने CRP CSA-XVI अंतर्गत कस्टमर सर्व्हिस असोसिएट (क्लर्क) पदांच्या ११,४०३ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीद्वारे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक यांसह विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.
पात्रता व वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे बंधनकारक आहे.
उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच २ ऑगस्ट १९९८ ते १ ऑगस्ट २००६ या कालावधीत जन्म झालेला असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात १,०५१ जागा
राज्यानुसार जाहीर झालेल्या रिक्त पदांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १,७३१ जागा असून त्यानंतर कर्नाटकमध्ये १,४१४, तर महाराष्ट्रात १,०५१ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल (९४६), गुजरात (६९८), तामिळनाडू (६७५), मध्य प्रदेश (५७०), बिहार (४९१), पंजाब (४८१), दिल्ली (४१५), राजस्थान (३९२), आसाम (३४९), ओडिशा (३३७), छत्तीसगड (२६५), हरियाणा (१९६), तेलंगणा (१९१), आंध्र प्रदेश (१८६), झारखंड (१८२), उत्तराखंड (१४५), केरळ (१०८), हिमाचल प्रदेश (९७), जम्मू-काश्मीर (६७), गोवा (६१), पुडुचेरी (२६), दादरा व नगर हवेली (१८) आणि दमण-दीव (७) जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या स्वरूपात बदल
IBPS ने यावेळी मुख्य परीक्षेच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल केले आहेत. प्राथमिक परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार असली तरी मुख्य परीक्षेतील प्रश्नांची संख्या १५५ वरून १६० करण्यात आली आहे. तसेच परीक्षेचा कालावधीही वाढविण्यात आला असून उमेदवारांनी नव्या पॅटर्ननुसार तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया
भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. त्यामध्ये प्राथमिक ऑनलाइन परीक्षा, मुख्य ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (LLPT) यांचा समावेश आहे. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर २०२६, मुख्य परीक्षा डिसेंबर २०२६, तर अंतिम निवड यादी मार्च २०२७ मध्ये जाहीर होणार आहे.
आकर्षक वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना २४,०५० रुपये ते ६४,४८० रुपये मूलभूत वेतन मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर शासकीय भत्ते मिळणार असल्याने एकूण मासिक वेतन अधिक आकर्षक असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post