पुणे/जळगाव । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आज चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, १७ नोव्हेंबरपर्यंत हे वादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या वादळाच्या प्रभावामुळे देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, काही भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पुढे सरकत असताना वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किलोमीटर राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचे झोत ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे समुद्रकिनारी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट नाही
दरम्यान, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून, पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रात दिवसा उष्णता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान १५ अंशांपर्यंत
कोकणात कमाल तापमान ३३, तर किमान तापमान १९ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान १५ अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान १२ अंशांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात कमाल तापमान ३४, तर किमान तापमान २० अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे आणि निरभ्र राहणार असून, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही राज्यांमध्ये पावसाचा धोका निर्माण झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाऐवजी थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे.















Discussion about this post