मुंबई: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटप आणि उमेदवाराच्या नावावरून मोठी राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता असून, दुसरीकडे काँग्रेसने यावर एक मोठी अट घातली आहे.
शरद पवारांचा पाठिंबा, पण काँग्रेसची अट काय?
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिल्याने, विधान परिषदेसाठी पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देणार हे निश्चित आहे. मात्र, काँग्रेसने यात नवी भूमिका मांडली आहे. “जर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील, तरच काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल,” अशी स्पष्ट अट काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी घातली आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून मविआचे नेतृत्व केल्याने त्यांनीच सभागृहात असावे, अशी काँग्रेसची भावना आहे.
उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम!
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ते आपला हा निर्णय बदलणार की मित्रपक्षांच्या आग्रहाखातर पुन्हा मैदानात उतरणार? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. जर ठाकरेंनी माघार घेतली, तर काँग्रेस अन्य उमेदवाराला पाठिंबा देणार का? यावरून मविआत फूट पडण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरा उमेदवार?
उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. विधान परिषदेच्या ९ जागांपैकी मविआच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा ठोकण्यात येत आहे. पण उमेदवार कोण आहे? यावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक संकेत दिले आहेत.
९ जागा आणि मविआचे समीकरण
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांपैकी महाविकास आघाडीच्या वाट्याला संख्याबळानुसार एक जागा येत आहे. या एका जागेवर शिवसेनेने दावा ठोकला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक संकेत दिले असले तरी, उमेदवार कोण असेल? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.















Discussion about this post