जळगाव । शहरालगतच्या विमानतळ परिसरातील ‘तारा बिझनेस पार्क’मध्ये भरदिवसा झालेल्या एका धाडसी घरफोडीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून १० लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईज बोहरा हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉकर अत्यंत सराईतपणे फोडून चोरट्यांनी त्यातील १० लाख रुपये रोकड (५०० आणि २०० च्या नोटा) आणि मौल्यवान दागिने चोरून नेले.
विमानतळ परिसर हा सुरक्षित मानला जातो, मात्र तिथेच भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या ही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी चोरीपूर्वी घराची ‘रेकी’ केली असावी किंवा यात कोण्या ओळखीच्या व्यक्तीचा हात असावा का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर मोईज बोहरा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.















Discussion about this post