मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटातून आणि तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे’, असे आश्वासन मोदींनी दिल्याचे सांगितले जात आहे. या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
कोर्टात सुनावणी सुरू असताना फुटीर खासदारांची भेट का घेतली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या भेटीतून नेमका काय संदेश द्यायचा होता? अमित शाह, देवेंद्र फडणवीस की थेट न्यायालयाला यातून धमकी द्यायची होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीही या भेटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘भिऊ नका’चा संदेश नेमका कुणासाठी?
उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी फुटीर खासदारांना ‘चिंता करू नका’ असा संदेश दिला. स्वामी समर्थांच्या ‘भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी’ या संदेशाप्रमाणे मोदी आता ‘भिऊ नका’ असे सांगत आहेत. ‘मोदी नवे स्वामी झाले का?’ असा खोचक सवालही त्यांनी केला.मोदी आंदोलक आणि विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, मात्र फुटीर खासदारांना भेटतात. केवळ भेटत नाहीत तर ‘मी तुमच्या पाठिशी आहे’ असे सांगतात, अशी टीका ठाकरे यांनी केली.
मोदी आणि फुटीर खासदारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असे सांगितले जात असताना त्यातील ‘भिऊ नका’ हे वाक्य बाहेर कसे आले? त्यातून कोणाला संदेश द्यायचा होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, शिंदे यांच्यासाठी हा संदेश होता का? न्यायालयाला धमकी देण्यासाठी हा संदेश होता का? अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांना काही सांगायचे होते का? असा सवाल त्यांनी केला.
‘इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आली’
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या सोशल मीडिया वापरावरूनही टोला लगावला. कोविडच्या काळात आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो, त्यावेळी आपल्यावर टीका करण्यात आली. मात्र आता पंतप्रधान तरुणांना प्रत्यक्ष भेटत नाहीत आणि इन्स्टाग्रामवरून संदेश देत आहेत. ‘इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आली आहे,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, या भेटीमागचा नेमका राजकीय संदेश काय, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.















Discussion about this post