जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी–भुसावळ रेल्वेमार्गावर भादली ते जळगावदरम्यान पाचव्या रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पांतर्गत भादली रेल्वे स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच नव्या पाचव्या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जोडण्या करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी भादली स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येणार आहे. या कामाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार असून १२ ऑगस्ट रोजी धावणाऱ्या भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही गाडी पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने निर्णयात बदल करत गाडी अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस अमळनेरपर्यंतच
गाडी क्रमांक १९००३ दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस १२ ऑगस्ट रोजी दादरहून नियोजित वेळेनुसार रवाना होईल. मात्र, ही गाडी भुसावळपर्यंत न जाता अमळनेर स्थानकापर्यंतच धावणार आहे.त्यामुळे अमळनेर ते भुसावळदरम्यानचा या गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. दादरहून खान्देशकडे येणाऱ्या प्रवाशांनी अमळनेरनंतरच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
गाडी क्रमांक १९००४ भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस १२ ऑगस्ट रोजी भुसावळ स्थानकातून सुटणार नाही. ही गाडी अमळनेर स्थानकातून नियोजित वेळेनुसार दादरच्या दिशेने रवाना होईल.त्यामुळे भुसावळ ते अमळनेर हा या गाडीचा प्रवास रद्द राहणार आहे. भुसावळ, जळगाव तसेच मार्गातील इतर स्थानकांवरून दादरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची विशेष नोंद घ्यावी.
प्रवाशांनी पर्यायी नियोजन करावे
भादली स्थानकावरील नॉन-इंटरलॉकिंगचे काम पाचव्या रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यार्डची पुनर्रचना आणि नव्या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जोडणीची कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी १२ ऑगस्ट रोजी प्रवास करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post