जळगाव : थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीजजोडणी करून वीज वापरणाऱ्या तीन ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई केली आहे. महावितरणच्या तपासणीत वीजचोरी उघडकीस आल्यानंतर संबंधितांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्रीराम चौक परिसरातील प्रतिभा रितेश पवार यांच्या वीजजोडणीचा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे ऑटो डिस्कनेक्ट करण्यात आला होता. मात्र, वीजपुरवठा खंडित असतानाही घरासमोरील लघुदाब वीजवाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचे महावितरणच्या पथकाला आढळले. या प्रकरणात सुमारे ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले.
आशाबाबा कॉलनीतील लक्ष्मी भानुदास बागडे यांच्या वीजजोडणीवरही थकबाकी असल्याने स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी वीजवाहिनीवर अनधिकृत जोडणी करून वीज वापरल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणात ३४ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणने नमूद केले आहे.
तर शिव कॉलनीतील स्वप्नील प्रशांत सैंदाणे याच्याकडूनही थकबाकीमुळे वीजपुरवठा बंद असताना अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ३८ हजार ८५० रुपयांची वीजचोरी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या तिन्ही प्रकरणांत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्या फिर्यादीवरून ७ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृतपणे वीजजोडणी करून वीज वापरणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणने विशेष पथके नियुक्त केली आहेत.
वीजपुरवठा स्वतःहून जोडल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. अनधिकृत जोडणीमुळे विजेचा धक्का लागून गंभीर किंवा प्राणघातक दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी अशा पद्धतीने वीजजोडणी करू नये. तसेच शेजाऱ्यांना अनधिकृतपणे वीजपुरवठा उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा संबंधितांवरही कारवाई केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post