जळगाव : वीजग्राहकाला कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजचोरीस मदत करणे आणि स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी जळगाव शहरात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन डिगंबर कांडेलकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या शनिपेठ कक्षांतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरद्वारे वीजचोरी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी कांचननगर येथील पंढरी ओंकार येशे यांच्या घरी महावितरणच्या पथकाने पंचांसमक्ष पाहणी केली.
सहायक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चौधरी यांनी वीज मीटर तसेच वीजपुरवठ्याची सखोल तपासणी केली. यावेळी स्मार्ट मीटर बायपास करून वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वीज वापरकर्ते रविंद्र पंढरी येशे यांना वीजचोरीचे एक हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्यांनी हे बिल भरले.
दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप
येशे यांनी दिलेल्या लेखी जबाबानुसार, २७ जुलै रोजी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी पवन कांडेलकर आला होता. त्यावेळी त्याने जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविताना दोन हजार रुपयांची मागणी केली. नवीन मीटरमध्ये असे काम करून देतो की, ते कोणाच्याही लक्षात येणार नाही आणि वीज बिल अतिशय कमी येईल, असे आमिष त्याने दाखविल्याचे ग्राहकाने जबाबात नमूद केले आहे.
त्यानंतर ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकाने नकार दिल्यानंतरही विविध कारणे सांगून त्याला आमिष दाखवून पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.
ग्राहकाविरुद्ध तक्रार नाही
संबंधित ग्राहकाने वीजचोरीचे देयक भरले असून हा गुन्हा तडजोडपात्र असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, महावितरणच्या मालकीच्या वस्तूंमध्ये छेडछाड करणे हा भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३८ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. पवन कांडेलकर याने वीजचोरीस मदत करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान केले तसेच वीज जोडणीत छेडछाड करून कंपनीचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलिसांकडून सुरू आहे.















Discussion about this post