नाशिक । नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तब्बल आठ दिवसांनंतर याच परिसरात दुसऱ्यांदा भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरातील नागरिकांना काही सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे भूकंपाचे धक्के साधारण तीन ते पाच सेकंद जाणवले. यावेळी घरातील वस्तू तसेच काही ठिकाणी दरवाजे आणि खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक हादरे जाणवताच काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले.
भूकंपाचे धक्के जाणवत असतानाच काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी घबराट निर्माण झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू निर्घुडपाडा असल्याची माहिती समोर आली आहे.यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी याच परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून नागरिकांना पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा हादरे जाणवल्याने कळवण तालुक्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
जीवितहानी नाही
सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहितीही समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, नुकसानीची पाहणी केली जात आहे. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्याची गरज व्यक्त होत आहे. भूकंपाची अचूक तीव्रता आणि केंद्राबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.















Discussion about this post