जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. छाननी प्रक्रियेत बाद ठरविण्यात आलेला आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपीलानंतर वैध ठरल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पाचोरा मतदारसंघात नव्याने निवडणुकीची चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून भाजपचे सतीश परशुराम शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची चर्चा सुरू झाली होती.
सुमित पाटील यांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविला. सुमित पाटील यांच्या ठरावासंदर्भातील तांत्रिक बाबीवर ही हरकत घेण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत सुमित पाटील यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
या निर्णयामुळे पाचोरा मतदारसंघातून सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला होता. परिणामी, त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.
नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे धाव
उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्यानंतर सुमित पाटील यांनी या निर्णयाला आव्हान देत नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले. या अपिलावरील निर्णयात त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे छाननी प्रक्रियेनंतर निर्माण झालेली परिस्थिती आता बदलली आहे. अर्ज वैध ठरल्याने सुमित पाटील यांना निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
पाचोऱ्यात भाजप-शिंदे गटात चुरस वाढणार?
सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र होते. मात्र, अपीलातील निर्णयामुळे या समीकरणाला धक्का बसला आहे. आता पाचोरा मतदारसंघात भाजपचे सतीश शिंदे आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघातील ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. एका बाजूला बिनविरोध निवडीची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला अपीलानंतर अर्जाला मिळालेली वैधता यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आता पुढील निवडणूक प्रक्रियेत काय घडते आणि पाचोऱ्यात प्रत्यक्ष सामना रंगतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post