जळगाव । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-बोदवड परिसरातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात वाहन चोरी आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील संशयित आरोपी सहभागी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे. या व्यक्तीचा दुष्काळ पाहणी दौऱ्यात सहभाग कसा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहिणी खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित करत, दुष्काळ पाहणीसारख्या कार्यक्रमात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती सहभागी होत असेल, तर त्याबाबत मंत्र्यांना माहिती होती का? असा सवाल केला. तसेच मंत्री गुलाबराव पाटील अशा आरोपींना पाठीशी घालत नाहीत ना, अशी टीकाही त्यांनी केली.

रोहिणी खडसे यांच्या या आरोपांनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुष्काळ पाहणीसाठी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यामध्ये कोण चोर आहे, कोण गुंड आहे किंवा कोणावर गुन्हा दाखल आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
“आम्ही कोणालाही निमंत्रित केले नव्हते. दुष्काळ पाहणीसाठी शेतकरी आले होते,” असे मंत्री पाटील यांनी सांगितले. दौऱ्यात एखादा संशयित आरोपी सहभागी झाला असेल, तर संबंधित व्यक्तीवर पोलिसांकडून नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सध्या शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना विरोधकांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी दुष्काळातही राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली.
मुक्ताईनगर-बोदवड परिसरातील दुष्काळ पाहणी दौऱ्यातील या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्या आरोपांवर सत्ताधारी नेत्यांकडून आणखी काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post