जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी चाळीसगाव तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईनंतर राहुल पाटील यांनी जिल्हाप्रमुखांसह आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
राहुल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी आमदार आणि जिल्हाप्रमुखांकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आमदार किशोर पाटील यांनी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचाही दावा राहुल पाटील यांनी केला आहे.
यावेळी राहुल पाटील यांनी संबंधित फोनवरील कथित संवाद पत्रकार परिषदेत ऐकवला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आपण थेट शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी शिंदे साहेबांना मानणारा कार्यकर्ता असून आजन्म शिवसैनिक आहे. हा सर्व प्रकार शिंदे साहेब आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावर घालणार आहे. मला वाटते त्यांना हा प्रकार माहिती नाही,’ असे राहुल पाटील यांनी म्हटले.
तसेच पक्षशिस्तीच्या कारवाईवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. ‘पक्षशिस्त केवळ आम्हीच पाळायची का? नेत्यांना पक्षशिस्तीतून सूट आहे का? मुळात जिल्हाप्रमुखांवरच पक्षशिस्त भंगाची कारवाई झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्यात आले,’ असा आरोप राहुल पाटील यांनी केला.
दरम्यान, राहुल पाटील यांच्या हकालपट्टीमुळे चाळीसगावमधील शिंदे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या आरोपांवर आमदार किशोर पाटील आणि जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांची भूमिका काय राहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post