नवी दिल्ली । काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधातील तक्रारीची सत्यता पडताळण्याचे आणि तपासाची माहिती न्यायालयाला देण्याचे केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) निर्देश देणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी (२५ नोव्हेंबर) रद्द केले. तसेच हे प्रकरण नव्याने विचार करण्यासाठी पुन्हा अलाहाबाद हायकोर्टाकडे पाठवले आहे
नेमके प्रकरण काय?
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती.
या याचिकेवर मे २०२६ मध्ये सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने तक्रारीतील आरोपांची कायद्यानुसार पडताळणी करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना दिले होते. तसेच तपासातील प्रगतीची माहिती न्यायालयाला देण्यास सांगितले होते. त्यानंतर सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत अधिक माहिती मागवली होती.
अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रक्रियेच्या कायदेशीर वैधतेवर तसेच याचिकाकर्त्याच्या याचिका दाखल करण्याच्या अधिकारावर आणि हेतूवर त्यांच्या बाजूने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाचे संबंधित आदेश रद्द करून प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवले. राहुल गांधी यांना या प्रकरणात पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याचिका सुनावणीस पात्र आहे की नाही, या मुद्द्यासह सर्व बाबींवर उच्च न्यायालयाला नव्याने विचार करावा लागणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना तूर्तास दिलासा मिळाला असला, तरी बेहिशेबी मालमत्तेचे आरोप न्यायालयाने खोटे ठरवलेले नाहीत. आता या प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयात नव्याने सुनावणी होणार असून, पुढील निर्णयाकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post