रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच चुकीच्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेने नियम अधिक कडक केले आहेत. नव्या तरतुदीनुसार अशा प्रवाशांना आता पूर्वीपेक्षा अधिक दंड भरावा लागणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वसामान्यांसाठी सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र काही प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटाच्या आधारे प्रवास करत असल्याने रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दंडाच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
२० जूनपासून नवे नियम लागू
‘जन विश्वास अधिनियम २०२६’ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणे, वापरलेले तिकीट पुन्हा वापरणे किंवा चुकीच्या वर्गाचे अथवा चुकीच्या मार्गाचे तिकीट वापरून प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा मानला जाणार आहे.
दंडाची रक्कम वाढली
यापूर्वी विनातिकीट प्रवास करताना पकडलेल्या प्रवाशांकडून किमान २५० रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र आता हा दंड वाढवून ५०० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित प्रवासाचे पूर्ण भाडेही वसूल केले जाणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
नियम मोडल्यास तुरुंगवासाचीही तरतूद
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दंड भरण्यास नकार देणे किंवा वारंवार नियमांचे उल्लंघन करणे गंभीर स्वरूपाचे मानले जाईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट घेणे, योग्य श्रेणीचे तिकीट वापरणे आणि रेल्वे नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.















Discussion about this post