जळगाव । जळगावच्या नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या पतीने आपल्या पत्नीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नशिराबाद पोलिसांनी घटनेनंतर तातडीने चक्र फिरवत पसार झालेल्या आरोपी पतीला काही तासांतच जेरबंद केले आहे.
मंदाबाई विकास जाधव असे मृत महिलाचे नाव आहे. मंदाबाई या नशिराबाद येथील रहिवासी रामा सोमा बागले यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह रायपूर येथे झाला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. सोमवारी याच वादातून संतापाच्या भरात पती विकास जाधव याने दारूच्या नशेत मंदाबाई यांच्यावर कोयत्याने थेट मानेवर वार केले. हा वार इतका भीषण होता की, मंदाबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी विकास जाधव घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी विकास जाधव याला अल्पावधीतच शोधून काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कौटुंबिक वादातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, हत्येचे नेमके आणि सविस्तर कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा (भादंवि कलम ३०२ अंतर्गत) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.














Discussion about this post