जळगाव । विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर येऊ लागली आहे. पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी नाशिकच्या निकालावर प्रतिक्रिया देताना जळगाव आणि नाशिकमधील राजकीय घडामोडींची तुलना करत सूचक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
किशोर पाटील यांनी सांगितले की, नाशिकमध्ये काय घडू शकते याची कल्पना काही नेत्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे जळगावमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट ठेवत महायुती धर्माचे पालन केले.
“पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही आमचे दोन्ही अर्ज मागे घेतले, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पूर्ण ताकदीने काम केले. इतकेच नव्हे तर दुसऱ्या पसंतीच्या मताबाबतही पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पाळली. त्यामुळे जळगावमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला,” असे पाटील यांनी सांगितले.
मात्र नाशिकच्या निकालाचा उल्लेख करताना त्यांनी खंत व्यक्त केली. जिथे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाची अपेक्षा होती, तिथे वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे भविष्यातील राजकारणात अधिक सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“माझ्या राजकीय प्रवासात अनेक वेळा माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून राजकीय अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल. राजकारणात सावध राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, किशोर पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकच्या निकालानंतर महायुतीतील समन्वय, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि मित्रपक्षांतील विश्वास यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाकडे महत्त्वाचे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.















Discussion about this post