मुक्ताईनगर । मुक्ताईनगर ते घोडसगाव मार्गावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या भुसावळ येथील तरुण व्यापाऱ्याच्या वडिलांना इनोव्हा कारने कट मारून खाली पाडल्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील पाच लाख रुपये रोख असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपी कारमधून पसार झाले. २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घोडसगाव शिवारातील विश्रांती हॉटेलसमोर हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील वसंत टॉकीजमागील सुविधा निवासस्थान परिसरातील रहिवासी आणि व्यापारी यश लक्ष्मीकांत जोशी (वय २३) यांच्या वडिलांचा मुक्ताईनगर-घोडसगाव मार्गावरून दुचाकीने प्रवास सुरू होता. घोडसगाव शिवारातील विश्रांती हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या एमएच १२ पीक्यू ३९५६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला कट मारला.
या धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले. त्यांना सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच कारमधून चौघे जण खाली उतरले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील पाच लाख रुपये रोख असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर चौघेही इनोव्हा कारमधून घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर यश जोशी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात प्रसाद शिवदास बोंडे (रा. आमडगाव, ता. बोदवड), गौरव सुधीर राजपूत, विकी ईश्वर गुरचाळ आणि निलेश ईश्वर गुरचाळ (तिघेही रा. नडगाव, ता. बोदवड) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बोदवड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दंगल, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम आणि दरोड्याचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (कलम ३०२) नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर सर्व संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.














Discussion about this post